जिंतूरात दोन गटांत जागेवरून वाद

जिंतूर (अजमत पठाण):-
शहरातील येलदरी रोडवरील जागेच्या मालकीवरून पुन्हा एकदा दोन गटामध्ये शाब्दिक बाचाबाची नंतर तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्यानंतर तणाव निवळला. मात्र यामुळे परिसरात काही काळ चांगलीच तणावाची परिस्थिती उद्भवली होती.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शहरातील येलदरी रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातील एका जागेच्या मालकी हक्कावरून माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर व सय्यद मुखीद यांच्या गटामध्ये काही दिवसांपूर्वीच वाद निर्माण झाला होता. तेव्हाही पोलिस प्रशासनाने मध्यस्थी केल्यामुळे प्रकरणावर काही काळ पडदा पडला होता. परंतु रविवार दि. ८ मे रोजी सकाळच्या सुमारास भाजपा शहर अध्यक्ष दत्ता कटारे यांनी तीन ते चार ट्रॅक्टर दगड सदरील वादग्रस्त जागेसमोर टाकल्याने पुन्हा एकदा दोन्ही गटाचे समर्थक समोरासमो आले.
यामुळे काही क्षणात जागेच्या मालकी हक्कावरून शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. बघता- बघता त्या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाला माहिती मिळताच पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी हजर झाला व त्यांनी मध्यस्ती करून प्रकरण निवळण्याचे काम केले. मात्र सदरील प्रकरणामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते परिणामी वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याचे दिसून आले.
सद्यस्थितीत प्रकरण जरी शांत झाले असेल तरी भविष्यात या जागेच्या मालकी हक्कांवरून दोन गटांमध्ये मोठा वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेऊन यावर कायम स्वरूपी योग्य तोडगा काढणे गरजेचे बनले आहे.