ताकई रस्त्यासाठी तहसीलदारांनी घेतला पुढाकार.
खोपोली नगर परिषद, वन विभाग, महावितरण, पोलीस प्रशासन व ठेकेदारासोबत चर्चा.

खालापूर (जि. रायगड) / प्रतिनिधी :-
मागील अनेक वर्षांपासून ताकई रस्त्यांचे काम प्रलंबित आहे. याबाबत जेष्ठ पत्रकार पैलवान हनुमंतराव ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन (ABJF), रायगड संघर्ष समिती व ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने अनेक वेळा आंदोलन, उपोषण करण्यात आल्यानंतरही रस्त्यांचे काम मार्गी लागत नसल्याने तहसीलदार यांनी आज मंगळवार (दि. 28 जून) रोजी खोपोली नगर परिषदेला चांगलेच धारेवर धरले. ऐवढेच नव्हे तर रस्त्यांचे काम करतांना येणाऱ्या अडचणीबाबत खोपोली नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांची वन विभाग, महावितरण, पोलीस प्रशासन व ठेकेदारांसोबत चर्चा घडवून आणण्यात आली.
जनहिताच्या मागण्यांसाठी दि. 10 जून 2022 रोजी उपोषण केल्याने जेष्ठ पत्रकार पैलवान हनुमंतराव ओव्हाळ यांची प्रकृती चांगलीच खालावली आहे. तब्येत बिघडल्याने पुणे येथील रूग्णालयात त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. मात्र, ज्या कामांसाठी जेष्ठ पत्रकार पैलवान ओव्हाळ यांनी आंदोलन पुकारले होते, त्यातील अनेक विषय अद्यापही मार्गी लागलेले नाहीत. यासर्व मागण्यांबाबत आज तहसीलदार अय्युब तांबोळी यांनी तातडीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा केपी न्यूज चैनल एडीटर इन चिफ फिरोज पिंजारी, पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली (भारत) रायगड जिल्हा महासचिव तथा अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन महाराष्ट्र राज्य सरचिटणीस खलील सुर्वे, कोकण प्रदेश अध्यक्ष पत्रकार नरेश जाधव, रायगड जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सतिश रावळ यांच्यासह खोपोली नगर परिषद, वन विभाग, खोपोली पोलीस स्टेशन, रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, महावितरण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच खालापुर तहसील कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
छोट्या – छोट्या कामांबाबत संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून वेळकाढूपणा काढण्यात येत असल्याने तहसीलदार अय्युब तांबोळी यांनी संबंधितांना चांगलेच धारेवर धरले. दि. 10 जून 2022 रोजी उपोषण सोडताना संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन अद्यापही पूर्णत्वास गेलेले नाहीत. खालापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या जागेत साधा फलकही मागील 15 दिवसांत सार्वजनिक बांधकाम विभागाला लावता आलेला नाही. तसेच 28 जून आली तरी हाळ बुद्रुक दफनभूमीतील ट्रान्सफार्मर अद्याप शिफ्ट झालेला नाही. मंजूरी मिळून 15 दिवस उलटले तरी ताकई रस्त्यांवरील विद्युत पोल खोपोली नगर परिषद विभागाकडून शिफ्ट करण्यात आलेले नाहीत, यासर्व अनास्थेबद्दल तहसीलदार यांनी संबंधित विभागांवर संताप व्यक्त केला. तसेच त्वरीत कामाला सुरुवात करण्याचा आदेश बजावला.
रायगड जिल्हा परिषद कर्जत उपविभागीय बांधकाम अधिकारी व पाटबंधारे विभागालाही अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशनकडून करण्यात आलेल्या मागण्यांबाबत लवकरात लवकर ठोस निर्णय घेण्याचे आदेश तहसीलदार अय्युब तांबोळी यांनी दिले.