‘त्या’ अपघातातील वाहन चालक पोलिसास अटक;नानलपेठ ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल .

परभणी/प्रतिनिधी
शहरातील जिंतूर रोडवर रविवारी (दि.4) दुपारी साडेतीनच्या सुमारास झालेल्या अपघात प्रकरणात नानलपेठ पोलीस ठाण्यात जीप चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
नानलपेठ पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करत मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास अपघात करणारा वाहन चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरेश गणेश कांबळे (वय ४२ वर्ष रा. लक्ष्मी नगर मंठा जि. जालना) याला ताब्यात घेण्यात आले. या घटनेतील सचिन वैजनाथ देशमुख (रा. झरी) या जखमीने उपचार घेत असताना याबाबत तक्रार दिली. ते चुलत बहिणीचे लग्न लावून झरी येथे परत जात असताना जिंतूर रोडवर बसला ओव्हरटेक करताना (एम.एच. 21 बी. एफ. 4477) या क्रमांकाच्या जीपने त्यांना जोराची धडक दिली. देशमुख व त्यांचे चुलत भाऊ आकाश देशमुख हे जखमी झाले. जीप चालकाने आपले वाहन भरधाव वेगात व हलगर्जीपणे चालवून इतर पाच दुचाकींना देखील उडविले. यामध्ये फयाज अली खान नियाज अली खान (वय 60रा. मुमताज नगर, परभणी) हे मयत झाले. तर इतर सहा जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर जीप चालक आणि गाडीतील इतर व्यक्ती पळून गेल्या. या प्रकरणी जीप चालकावर गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक समाधान चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ शिंदे करत आहेत. तपासा दरम्यान, आरोपी जीप चालक जालना एसआरपीएफमध्ये सेवेत आहे, अशी माहिती मिळाली आहे. आरोपीचा शोध घेत मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास सुरेश गणेश कांबळे याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी आरोपी कांबळे याची वैद्यकीय तपासणी केली असून अहवाल प्रयोगशाळेत पाठविले आहेत. या अपघातातील एक गंभीर जखमी दत्ता देशमुख यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आले आहे. आरोपी कांबळे याच्यासोबत जीपमध्ये इतर चार ते पाच जण होते. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.