मुस्लिम समाजाच्या इज्तेमास सुरुवात लाखो नागरीकांचा सहभाग.
दिवसभर भरगच्च कार्यक्रम.

परभणी (अजमत पठाण)
परभणी -हिंगोली जिल्ह्याचे मुस्लिम समाजाचे दोन दिवसीय इस्तेमा परभणी तालुक्यातील पेडगाव शिवारात बुधवारी (दि.07) सकाळी फजर ची नमाज अदा करीत (सूर्योदयापूर्वी अजान) मुस्लिम समाजाच्या इज्तेमास प्रारंभ झाला.
परभणी व हिंगोली या दोन जिल्ह्यांतील लाखांवर नागरीकांनी या इज्तेमास हजेरी लावली. दिवसभराच्या भरगच्च कार्यक्रमात बुधवारी पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत शिस्तबध्द पध्दतीचे दर्शन घडविले.
परभणी शहरापासून अवघ्या 14 किलोमीटर अंतरावरील पेडगांव शिवारात आयोजित केलेल्या या दोन दिवशीय तब्लिगी इज्तेमास बुधवारी (दि.07) सकाळपासून प्रारंभ झाला. परभणी व हिंगोली या दोन जिल्ह्यातील लाखांवर नागरीकांनी या इज्तेमास हजेरी लावली. परभणीपासून ते पेडगाव पर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग मध्यरात्रीपासूनच वाहनांच्या संख्येने, गर्दीने गजबजला होता. विशेष म्हणजे या महामार्गावर लाखांवर नागरीक दाखल होवून सुध्दा कुठेही वाहतूकीची कोंडी झाली नाही. शिस्तबध्द पध्दतीने, जथ्थ्यानिशी विविध वयोगटातील नागरीक अभूतपूर्व उत्साहाने या इज्तेमात दाखल झाले. यावेळी सूर्यादयापूर्वी फजरची नमाज अदा करण्यात आली. त्या पाठोपाठ इज्तेमास प्रारंभ झाला.
बुधवारी पहाटेपासून सायंकाळी उशीरापर्यंतच्या या इज्तेमात विविध प्रतिष्ठित उलेमाच्या हजेरीत वेगवेगळ्या सत्रांमधून अल्लाहची भक्ती तसेच अल्लाहचे शेवटचे प्रेषित (दूत) मुहम्मद पैगंबर यांची शिकवण तसेच पवित्र कुरआन या ग्रंथाविषयी यथायोग्य मार्गदर्शन, विचारमंथन सुरु होते. तसेच नमाजाचे महत्व या विषयीसुध्दा स्वतंत्रपणे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. नमाज कसा पढावा, कुरआनाचे पठण कसे करावे या विषयीचे शिक्षण, प्रशिक्षणसुध्दा या इज्तेमातून दिल्या गेले.
या इज्तेमात दिवसभरात फजर की नमाज, जोहर, असर, मगरीब व इशा की नमाज अशा पाच नमाज अदा करण्यात आल्या.
भव्य असा मंडप गर्दीने गजबजला…
पेडगांवात या इज्तेमाच्या निमित्ताने जवळपास 100 एकरात विविध व्यवस्था नागरीकांकरीता करण्यात आल्या आहेत. विशेषतः मुख्य कार्यक्रमांकरीता भव्य असा मंडप लक्षवेधी ठरला आहे. बुधवारी सकाळपासून या मंडपात प्रमुख धर्मगुरु व उलेमांच्या उपस्थितीत विविध सत्रांमधून कार्यक्रम सुरु होते. यास लाखांवर नागरीक उपस्थित होते. त्यामुळे मंडप गर्दीने अक्षरशः फुललेला होता.
वजूखाना….
लाखांवर नागरीकांना हात,पाय व तोंड धुण्याकरीता भव्य असा वजूखाना या परिसरात उभारण्यात आला आहे. त्यासाठी पाण्याची व्यवस्था, सांडपाण्याची व्यवस्थाही उत्तम पध्दतीने करण्यात आली आहे.
दानशूर व्यक्तींचे दातृत्व…
या दोन जिल्ह्यांसाठीठी आयोजित केलेल्या या इज्तेमात संयोजन समितीतर्फे अतीशय अल्प दरात चहा-पाणासह नाष्टा व भोजनाची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. परंतु, दानशूर व्यक्तींनी या नागरीकांकरीता मोफत अन्नदानाचे उपक्रमही हाती घेतले आहेत. चहा-पाणी, नाष्टा, जेवण, फराळ तसेच फळ-फळावळसुध्दा दानशूर व्यक्तींनी नागरीकांसाठी उपलब्ध केले. काही ठिकाणी पाणी पाऊच, पार्सलची व्यवस्थासुध्दा करण्यात आली.
अद्वितीय अशी पार्कींग व्यवस्था…
अद्वितीय अशी पार्किंग व्यवस्था इज्तेमात येणार्या चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी करण्यात आली आहे. पार्किंग सांभाळण्यासाठी शेकडो स्वयंसेवकांना दोन्ही बाजूंनी जबाबदारी निश्चित करून देण्यात आली आहे. या पार्कींगस्थळी बुधवारी पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत हजारो वाहने अतीशय शिस्तबध्द पध्दतीने उभी होती. त्यामुळे पार्कींग स्थळसुध्दा लक्षवेधी ठरला.
शेकडो स्वयंसेवकांचे योगदान…
इज्तेमाच्या परिसरात उभारल्या गेलेल्या पेंडॉलमध्ये व्यवस्थेतील शेकडो स्वयंसेवक सर्व व्यवस्था सुरळीतपणे पार पडाव्यात या दृष्टीने प्रयत्नशिल आहेत. मुख्य मंडप, वजूखाना, बैतूखाना या व्यतिरिक्त वैद्यकीय सुविधा, प्रदर्शनी व अन्य मंडपात हे स्वयंसेवक कार्यरत आहेत.
उद्या दुआ…
या दोन दिवशीय इज्तेमात गुरुवारी सामूहीक प्रार्थना होणार आहे. त्यासाठी आणखी लाखांवर नागरीक हजेरी लावतील, असा अंदाज आहे. कोरोनाच्या दोन वर्षाच्या खंडानंतर आयोजित केलेल्या या इज्तेमात यावर्षी नागरीकांचा अभूतपूर्व असा उत्साह वाखाणण्याजोगा ठरला आहे.