आरोग्य व शिक्षणजिल्हाताज्या घडामोडीप्रशासकीयमराठवाडामहाराष्ट्रविशेष

सकारात्मक ऊर्जानिर्मितीसाठी सूर्यनमस्कार करा -जिल्हाधिकारी आंचल गोयल 

परभणी (अजमत पठाण):-

निरोगी जीवन जगण्यासाठी सुदृढ शरिरा सोबत सकारात्मक ऊर्जेची आवश्यकता असते. ही सकारात्मक ऊर्जा आपल्याला सूर्यनमस्कारातून मिळते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने नियमित सूर्यनमस्कार करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी केले. 

महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा विभाग आणि इतर विभागांच्या संयुक्त विद्यमाने आज शनिवारी (दि.28) प्रियदर्शिनी इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुल येथे जागतिक सूर्य नमस्कार दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमप्रसंगी उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी श्रीमती गोयल बोलत होत्या.  

महागरपालिका आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, शिक्षणाधिकारी (मा.) आशा गरुड, शिक्षणाधिकारी (प्रा.) श्रीपाद देशपांडे, क्रीडा अधिकारी शैलेंद्रसिंह गौतम, नानकसिंग बस्सी, जागतिक योग दिन समितीचे अध्यक्ष सुभाषराव जावळे पाटील, सचिव कृष्णा कवडी, दीपक महेंद्रकर व्यासपीठावर उपस्थित होते. 

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त परभणी येथे सूर्यनमस्कार दिनाची सुरुवात होत आहे, ही आनंददायी बाब आहे. याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण आज येथे मिळत आहे. निरोगी आयुष्यासाठी प्रत्येकाने स्वत:साठी वेळ राखून ठेवावा. त्यासाठी नियमित व्यायाम करण्याची आवश्यकता असून, सूर्यनमस्कार करण्यासाठी कोणतेही साहित्य लागत नाही. सूर्यनमस्कारामुळे चित्त शांत राहते आणि त्यातून दिवसभर काम करण्यासाठी सकारात्मक ऊर्जा मिळते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या दैनंदिनीत सूर्यनमस्काराचे नियोजन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी केले. दहा वर्षापूर्वी आयएएस अकादमीत सूर्यनमस्कार करतानाची आठवण सांगून आताही वेळ काढून सूर्यनमस्कार करत असल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या शुभेच्छा संदेशाचे यावेळी वाचन करण्यात आले. 

राज्य जागतिक सूर्यनमस्कार दिन जागतिक योगदिन उत्सव समिती, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्र, महानगरपालिका, परभणी, महाराष्ट्र योगासन स्पोर्टस् असोशिएशन, क्रीडा भारती, परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध योग संस्थांचे प्रशिक्षक, सावित्रीबाई फुले मुलींचे हायस्कूल, सुमनताई गव्हाणे शाळा, भारतीय बाल विद्या मंदिर, आदर्श विद्यालय, सारंगस्वामी विद्यालय, मराठवाडा हायस्कूल, जिल्हा परिषद नांदगाव, आणि महानगर पालिकेच्या शाळेचे विद्यार्थी – विद्यार्थिनी सहभागी झाले होते. जिल्ह्यात जिल्हा व तालुकास्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धेच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जागतिक योग दिन समितीचे अध्यक्ष सुभाषराव जावळे पाटील यांनी केले तर सूर्यनमस्कार संचलन अशोक तळेकर यांनी केले. सूत्रसंचालन मीना कुलकर्णी, डॉ.दीपक महिंद्रकर प्रा. कल्याण कणके, जी. आर. देशमुख, रामेश्वर शिंदे, विठ्ठल तळेकर तसेच कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता योग संघटनेमधील विविध कार्यकर्ते तसेच धिरज नाईकवाडे, महेंद्र धबाले, योगेश आदमे, प्रकाश पंडित आदीनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.