जितुर तालुक्यातील बोरी येथे दोन गटात दगडफेक; 23 जणांवर गुन्हा दाखल
पोलीस अधीक्षक रागसुधा आर.यांनी भेट देऊन घेतला परिस्थितीचा आढावा.

जिंतूर (अजमत पठाण)
तालुक्यातील बोरी येथील माळी गल्ली व प्रबुद्ध नगर मधील तरुणांच्या दोन गटात किरकोळ वाद झाल्यानंतर मारहाण व दगडफेकीची घटना मंगळवारी (दि.7) घडली. या घटनेत काहीजण किरकोळ जखमी झाले तर एक इसम डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाला आहे. परस्पर विरोधी तक्रारीवरून दोन्ही गटातील 23 जणांवर गुन्हा दाखल झाला असून 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बुधवारी (दि.8) व्यापार्यांनी दुकाने बंद ठेवून बंद पाळला असून गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.
बोरी येथील माळी गल्ली व प्रबुध्द नगर मधील काही तरुणांमध्ये मंगळवारी (दि.7) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास क्षुल्लक कारणावरून शिवीगाळ व धक्काबुक्कीची घटना घडली. या घटनेनंतर प्रबुद्ध नगरमधील तरुणांनी माळी गल्लीत येऊन शिवीगाळ व मारहाण केल्याचे माळी गल्लीतील तरुणांनी सांगितले. तर माळी गल्लीतील काही तरुणांनी व नागरिकांनी आमच्या वस्तीत येऊन आम्हाला शिवीगाळ व मारहाण केली, असे प्रबुद्ध नगर मधील तरुण सांगत आहेत. शिवीगाळ व मारहाणीची घटना घडल्यानंतर दोन्ही गटात दगडफेक झाली. यात काहीजण किरकोळ जखमी झाले.
दोन्ही गटातील तरुण व नागरिक शेकडोंच्या संख्येने आमने-सामने आले होते. परंतु पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकारी सरला गाडेकर यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवून हस्तक्षेप केला. दोन्ही गटातील जमावाच्या मध्यभागी पोलीस गाडी लावून गाडेकर यांनी परस्परांशी भिडलेल्या जमावातील अंतर वाढवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. परभणी व इतर ठिकाणाहून पोलिसांची कुमक मागवण्यात आली. विशाल प्रसादराव घोलप (रा. माळी गल्ली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रबुद्ध नगरमधील बारा जणांवर तर उषाबाई सुधाकर कनकुटे (रा.प्रबुद्ध नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माळी गल्लीतील अकरा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. घोलप यांनी फिर्यादीत गल्लीतील साक्षीदार महिलेस शिवीगाळ का केली? याची विचारणा केली असता आरोपींनी शिवीगाळ करत लाठी-काठी, कोयता, दगडांनी मारहाण केल्याचे सांगितले.तर उषाबाई कनकुटे यांनी त्यांच्या फिर्यादीत घरासमोर उभी असताना आरोपींनी हाताला धरून ओढले व जातीवाचक शिवीगाळ करत थापड बुक्क्यांनी व दगडाने मारहाण केल्याचे म्हटले आहे. या घटनेत पोलिसांनी माळी गल्लीतील तीन तर प्रबुद्ध नगर मधील दोन जणांना ताब्यात घेतले आहे. व्यापार्यांनी बुधवारी (दि.8) आपापली दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.
पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांनी पोलिस ठाण्यात येऊन परिस्थितीचा आढावा घेतला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक काळे, पोलीस उपअधीक्षक गोफणे यांनी देखील भेट दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर, पोलीस उपनिरीक्षक खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचार्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण शांतता आहे.